धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या 750 व्या जयंती वर्षानिमित्त ‌‘ज्ञानियांचा राजा' या विशेष अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.संत ज्ञानेश्वरांच्या अध्यात्मिक विचारांचा, समाजप्रबोधनाच्या कार्याचा आणि त्यांच्या सांस्कृतिक वारशाचा परिचय नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम रविवार,दि. 5 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता धाराशिव येथील प्रति काशी सिद्धेश्वर तीर्थक्षेत्र सभागृह,वडगाव येथे संपन्न होणार आहे.

मराठी संतसाहित्यातील अजरामर व्यक्तिमत्त्व असलेल्या संत ज्ञानेश्वर माऊली यांनी अध्यात्म,तत्त्वज्ञान आणि भक्तीपरंपरेला नवे परिमाण दिले.त्यांच्या ज्ञानेश्वरी आणि अभंग साहित्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाला समृद्ध केले आहे.त्यांच्या विचारांतून समाजात समता,बंधुता आणि मानवतेचे मूल्य दृढ झाले असून आजही त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या 750 व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमामध्ये त्यांच्या जीवनकार्याचा आणि अध्यात्मिक संदेशाचा वेध घेणारे विविध सांस्कृतिक व प्रबोधनपर सादरीकरण करण्यात येणार आहे. संत साहित्य,भक्तीपरंपरा आणि समाजप्रबोधन या विषयांचा समन्वय साधत हा कार्यक्रम रसिकांना एक वेगळा सांस्कृतिक अनुभव देणार आहे.

कार्यक्रमात प्रख्यात व्याख्याते तसेच स्वास्थ्य व समाज विषयक प्रबोधनकार श्री.गणेश शिंदे हे संत ज्ञानेश्वरांच्या जीवनकार्याचा, तत्त्वज्ञानाचा आणि समाजजीवनावरील प्रभावाचा उहापोह करणार आहेत.तसेच ‌‘मोगरा फुलला' या विशेष सादरीकरणातून ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्तीपरंपरेचा आणि आध्यात्मिक वारशाचा सुरेल आणि भावस्पर्शी आविष्कार सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमातून संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांतील जीवनदृष्टी, समाजजागृतीचा संदेश आणि अध्यात्मिक चिंतनाची परंपरा यांचा परिचय नव्या पिढीला होणार आहे. अध्यात्म आणि संस्कृती यांचा संगम घडविणारा हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या संतपरंपरेच्या जतन आणि संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

हा कार्यक्रम ॲड.आशिष शेलार, मंत्री (सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स,माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास),महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून तसेच मा. डॉ.किरण कुलकर्णी,सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करणे, अभिजात कला,लोककला, संतपरंपरा आणि थोर कलावंतांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या 750 व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेला ‌‘ज्ञानियांचा राजा'* हा कार्यक्रम त्या उपक्रमांचाच एक महत्त्वपूर्ण भाग असून,संत साहित्य आणि अध्यात्मिक विचारांचा वारसा समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचविण्याचा त्यामागील उद्देश आहे.

सदर कार्यक्रमासाठी प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य असून अध्यात्मप्रेमी, साहित्य रसिक,सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विशेष कार्यक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्रीराम पांडे,संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य,मुंबई यांनी केले आहे.

 
Top