धाराशिव (प्रतिनिधी)-  बस स्थानकात होणाऱ्या प्रवासी गर्दीच्या फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने तसेच पुरुषांच्या खिशातील पॉकेट देखील चोरण्याचे प्रमाण दिवसाढवळ्या सर्रासपणे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. चोरट्यांना रोखण्यासाठी ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद व्हावेत यासाठी 8 सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसविलेले आहेत. मात्र, जे कॅमेरे बसवलेत त्याचा आणि बसमध्ये चढणारे प्रवाशी व त्या प्रवाशांना लुटणारे चोरटे त्या कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाहीत अशाच रीतीने बसविलेले आहेत. ते कॅमेरे चोरट्यांच्या मदतीसाठी असल्याचे दिसून येत आहे. मोठ्या अंतरावर कॅमेरे असल्यामुळे त्यामध्ये प्रवासी व चोरटे यांचा चेहरा देखील स्पष्टपणे दिसून येत नाही. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अवस्था धाराशिव बस स्थानकाची झाली आहे. 

धाराशिव येथील बस स्थानकामध्ये बस लावण्यासाठी 22 फलाट फार्म आहेत. उत्तरेकडील बाजूस 1 ते 10 फलाट फार्म तर दक्षिणेकडील बाजूस 11 ते 22 फलाट फार्म असे आहेत. मात्र, या दोन्ही फलाट फॉर्मवर आतील व बाहेरील बाजूस सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. मात्र, बाहेरील बाजूस असलेले कॅमेरे दोन्ही टोकाला बसलेले आहेत. त्यामुळे बसमध्ये चढणाऱ्या व उतरणाऱ्या प्रवाशांचे चेहरे अस्पष्ट दिसतात. याच संधीचा फायदा घेऊन चोरटे प्रवासी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने,  पर्स व पिशवीमधील रोकडची तर काही विद्यार्थ्यीनींचे मोबाईल व पर्स तसेच या पुरुषांचे देखील खिसे कापून मौल्यवान साहित्य चोरुन चोरटे पलायन करतात. 


30 जूनची घटना

दि.30 जून रोजी दुपारी 1 वाजता लागणारी धाराशिव-वैराग ही बस फलट क्रमांक 11 वर लागली होती. या बसला प्रवाशांची मोठी गर्दी होती. या बसमध्ये धाराशिव तालुक्यातील झरेगाव येथील गंगाबाई मारुती संकपाळ वय (67 वर्ष) या आपल्या गावाकडे जाण्यासाठी चढत होत्या. मात्र, या गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील 25 हजार रुपयांचे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी व सोन्याचे पान असलेला गळ्यातील माळ चोरून नेली. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यामध्ये गंगाबाई संकपाळ यांच्या तक्रारीवरून भा.न्या.सं. कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास संबंधित पोलीस अधिकारी करीत आहेत. अशा प्रकारच्या चोरीच्या घटना टाळण्यासाठी मंत्री सरनाईक यांनी तात्काळ बस स्थानकाच्या फलाट फार्मवर हाय फिक्सलचे कॅमेरे बसवावेत. त्याप्रमाणे पोलिसांची संख्या वाढवावी, अशी मागणी प्रवाशांतून होऊ लागली आहे.

 
Top