धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने गुरुवार, दि. 2 जुलै रोजी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले.
राज्य सरकारच्या धरसोडीच्या व नकारात्मक शैक्षणिक धोरणांमुळे राज्यातील शालेय शिक्षण विभाग प्रश्न ग्रस्त बनला आहे. राज्यकर्त्यांनी स्वतः साठी अतिशय आकर्षक पेंन्शन योजना लागू करून घेतलेली असताना शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांना जुनी पेंशन योजना लागू करण्यास चालढकल करीत आहेत. वीस बावीस वर्षा पासून राज्यातील हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांना विनावेतन वा अंशतः वेतनावर राबवून घेतले जात आहे. हा महाराष्ट्राच्या महान शैक्षणिक वारशाचा अपमान आहे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांना तीन लाभांची आश्वासीत प्रगती योजना लागू केली जात नाही, अशैक्षणिक कामाच्या ओझ्याने शिक्षक इतका वाकून गेला आहे की त्याला त्याचे मुळ काम शिकविण्यासाठी वेळच नाही. असे असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांमधे प्रचंड असंतोष आणि नाराजी निर्माण झाली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आणि प्रश्नांच्या पुर्ततेसाठी मराठवाडा विभागातील सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयासमोर मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष जे. एस. शेरखाने, केंद्रीय कोषाध्यक्ष ए. बी. औताडे, जिल्हा कार्याध्यक्ष डी. के. भोसले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सी. एन. माळी, एम. बी. डोके, भूम तालुकाध्यक्ष बी. ए. जाधव यांच्यासह संघाचे सदस्य, शिक्षक सहभागी झाले होते.
