परंडा (प्रतिनिधी)-“गुरू हा केवळ ज्ञानदाता नसतो, तर तो जीवनाला दिशा देणारा दीपस्तंभ असतो.“ या वाक्याचा प्रत्यय ज्यांच्या सहवासात प्रत्येक विद्यार्थी अनुभवतो, असे आदर्श गुरुवर्य, शिक्षणतज्ज्ञ, कुशल प्रशासक आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राचार्य डॉ.अशोक दादा मोहेकर.

गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. विजय फुलारी सर यांच्या हस्ते डॉ.अशोक दादा मोहेकर यांना प्रदान करण्यात आलेला “गुरु गौरव पुरस्कार“ हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून, तो संपूर्ण शिक्षकवर्गाचा, विद्यार्थीविश्वाचा आणि शिक्षणक्षेत्रातील प्रामाणिक सेवाभावाचा गौरव आहे.

डॉ.अशोक दादा मोहेकर यांनी शिक्षण महर्षी ज्ञानी मोहेकर महाविद्यालय, कळंबचे प्राचार्य म्हणून कार्य करताना विद्यार्थीकेंद्रित शिक्षणव्यवस्था उभारली. तसेच ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा या संस्थेचे सचिव म्हणून त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याचे महान कार्य केले. त्यांनी संस्थेचा विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधनाला चालना आणि शैक्षणिक संस्कार यांचा सुंदर समन्वय साधला.

त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक शैक्षणिक उपक्रम यशस्वी झाले. विद्यापीठाशी सातत्याने समन्वय ठेवत त्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी अहोरात्र परिश्रम घेतले. प्रशासनात पारदर्शकता, निर्णयक्षम नेतृत्व आणि प्रत्येक कर्मचाऱ्यावर असलेला विश्वास यामुळे महाविद्यालयात कौटुंबिक वातावरण निर्माण झाले. आज त्या संस्थेतील प्रत्येक कर्मचारी महाविद्यालयाला आपले घर समजतो, हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी पावती आहे.

डॉ.मोहेकर सरांचे व्यक्तिमत्त्व केवळ प्रशासकाचे नाही,तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या गुरूचे आहे. त्यांनी कधीही जात, धर्म, पंथ किंवा आर्थिक परिस्थितीचा भेदभाव केला नाही. प्रत्येक विद्यार्थी हा आपलाच आहे, या भावनेतून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली, अनेकांना रोजगाराची दिशा मिळाली आणि अनेकांचे जीवन घडले. म्हणूनच त्यांचे विद्यार्थी त्यांना केवळ शिक्षक नव्हे, तर वडिलांच्या प्रेमाने जपणारे मार्गदर्शक मानतात.

माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांसाठी डॉ. अशोक दादा मोहेकर हे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावाने, अभ्यासू वृत्तीने, प्रेमळ संवादाने आणि माणुसकीने आम्हाला जीवनाचे खरे मूल्य शिकवले. त्यांच्या सहवासात शिक्षण म्हणजे केवळ पदवी नव्हे, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे, हे आम्हाला उमगले.

आज त्यांना प्राप्त झालेला “गुरु गौरव पुरस्कार“ हा महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भावना आणि कृतज्ञतेचा सन्मान आहे. हा पुरस्कार त्यांच्या आयुष्यभराच्या निःस्वार्थ सेवेला, शिक्षणातील योगदानाला आणि समाजाभिमुख कार्याला मिळालेली योग्य दाद आहे. गुरुवर्य डॉ. अशोक दादा मोहेकर यांना मनःपूर्वक शतशः प्रणाम! आपण निरोगी राहावे, दीर्घायुषी व्हावे आणि आपल्या ज्ञानरूपी दीपातून पुढील अनेक पिढ्यांचे जीवन उजळत राहावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.


प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे

सहयोगी प्राध्यापक व संशोधन मार्गदर्शक, 

प्राणीशास्त्र विभाग

शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालय, परंडा

जिल्हा धाराशिव, महाराष्ट्र


 
Top