भूम (प्रतिनिधी)- पंढरपूरहून शेगावकडे परतीच्या प्रवासाला निघालेल्या श्री संत गजानन महाराज, शेगाव यांच्या पवित्र पालखीचे रविवार, दि. 2 ऑगस्ट 2026 रोजी भूम शहरात आगमन होणार असून, या पार्श्वभूमीवर शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत करण्यासाठी आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी संत गजानन महाराज व्यापारी सेवा मंडळ, भूम यांनी सर्व तयारी पूर्ण केली आहे.

दरवर्षी पंढरपूरहून शेगावकडे परतीच्या मार्गावर श्रींची पालखी भूम शहरातून मार्गक्रमण करते. या पालखीसोबत हजारो वारकरी आणि विविध दिंड्या सहभागी होत असल्याने शहरात भक्ती, नामस्मरण आणि टाळ-मृदुंगाच्या गजराने अवघे वातावरण दुमदुमून जाते. पालखीचे शहरात आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत आणि जयघोषात श्रींचे स्वागत करण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख चौक आणि मार्ग व्यापारी सेवा मंडळाच्या वतीने आकर्षक कमानी, पताका व स्वागत फलकांनी सजविण्यात येणार असून, पालखी मार्गावर सर्वत्र भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळणार आहे.

पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकरी भाविकांच्या सेवेसाठी संत गजानन महाराज व्यापारी सेवा मंडळाच्या वतीने श्री संत गजानन महाराज मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. वारकऱ्यांना भोजन, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात येत असून, सेवाभावी कार्यकर्ते या नियोजनात सहभागी झाले आहेत.व्यापारी सेवा मंडळाने शहरातील सर्व नागरिक, व्यापारी, युवक आणि भाविकांना पालखी सोहळ्यात सहभागी होऊन वारकऱ्यांची सेवा करण्याचे तसेच महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. या सोहळ्यामुळे भूम शहरात पुन्हा एकदा भक्ती, सेवा आणि वारकरी परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे.


 
Top