धाराशिव (प्रतिनिधी)-  ज्ञानाधारित स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळते. तसेच अभ्यासाविषयीची आवड वाढीस लागते. भविष्यातही जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल करावे. असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामार्फत आयोजित 'विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा2026' मध्ये उमरगा तालुक्यातील ग्रामीण प्रशाला, माडज येथील विद्यार्थ्यांनी राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव व पारितोषिक वितरण समारंभ जिल्हा परिषद, धाराशिव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. जिल्हास्तरीय स्पर्धेत समर्थ नंदकुमार जाधव यांनी प्रथम, प्रतिक विठ्ठल भोसले यांनी द्वितीय, तर प्रतीक्षा बाळू फुगटे हिने तृतीय क्रमांक पटकावला. तालुकास्तरीय स्पर्धेत ऋतुजा तानाजी शहापुरे, निकिता नवनाथ सूर्यवंशी व ईश्वर शिवशरणाप्पा कुंभार यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवित उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

या यशामागे उपक्रमशील शिक्षक डॉ. बालाजी मदन इंगळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास उपशिक्षणाधिकारी दिनकर होळकर,शिक्षण विस्तार अधिकारी भारत देवगुडे, वेतन अधीक्षक परतापुरे, शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 
Top