धाराशिव (प्रतिनिधी)- हिमोफिलियासारख्या दुर्मिळ अनुवांशिक रक्तस्त्राव विकारावर आयुर्वेदाच्या माध्यमातून वैज्ञानिक पद्धतीने संशोधन करणाऱ्या जगातील पहिल्या संरचित क्लिनिकल संशोधन प्रकल्पाचा यशस्वी समारोप धाराशिव येथे झाला. शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव आणि 'रक्तामृत इन हिमोफिलिया संशोधन व विकास विभाग' यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या अभिनव संशोधन प्रकल्पाच्या समारोप सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी व्हर्च्युअल माध्यमातून प्रमुख उपस्थिती दर्शविली.या संशोधनामुळे हिमोफिलिया रुग्णांसाठी आयुर्वेदाधारित पूरक उपचारपद्धतीच्या दिशेने नवी आशा निर्माण झाली असून,संशोधनातून विकसित झालेल्या धाराशिव पॅटर्न'ची आता देशभर चर्चा सुरू झाली आहे.

नुकत्याच झालेल्या समारोप सोहळ्यात महाराष्ट्रासह विविध राज्यांतील 130 हिमोफिलिया रुग्ण, वैद्यकीय तज्ज्ञ, संशोधक, सामाजिक संस्था, उद्योगसमूहांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी झाले होते. संशोधनाचे मार्गदर्शन प्रा.डॉ.एन.एस.गंगासागरे यांनी केले असून, मुख्य संशोधक डॉ. शुभम धूत यांच्या संकल्पना, नेतृत्व आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांतून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार झाला. हिमोफिलिया हा जन्मजात व दुर्मिळ रक्तस्त्राव विकार असून रक्त गोठविण्यासाठी आवश्यक असलेल्या क्लॉटिंग फॅक्टर्सच्या कमतरतेमुळे रुग्णांना वारंवार रक्तस्रावाचा सामना करावा लागतो.या आजारावर कायमस्वरूपी उपचार उपलब्ध नसून क्लॉटिंग फॅक्टर इंजेक्शन हा प्रमुख उपचार पर्याय आहे. मात्र,हा उपचार अत्यंत खर्चिक असल्याने अनेक रुग्णांना नियमित उपचार घेणे शक्य होत नाही. ही गरज ओळखून मुख्य संशोधक डॉ.शुभम धूत यांनी आयुर्वेदाच्या तत्त्वांवर आधारित 'रक्तामृत वटी' आणि 'रक्तामृत तैल'विकसित करून हिमोफिलिया रुग्णांसाठी पूरक उपचारपद्धतीवर आधारित संशोधन प्रकल्प सुरू केला.

4 ऑगस्ट 2025 ते 27 जून 2026 या कालावधीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील निवडलेल्या 130 हिमोफिलिया रुग्णांवर पूर्णपणे निःशुल्क उपचार करण्यात आले. संशोधनाच्या प्राथमिक निष्कर्षांमध्ये अनेक सकारात्मक बदल नोंदविण्यात आले. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी या संशोधनाचे कौतुक केले. कार्यक्रमात खासदार ओमप्रकाश पवनराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी व्हर्च्युअल माध्यमातून सहभाग घेतला. आयुष संचालक डॉ.रामन घुंगराळेकर यांनी हा प्रकल्प आयुर्वेदाच्या इतिहासातील अभिमानास्पद संशोधन असल्याचे सांगून शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली. क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लिमिटेडचे कृष्णकुमार बूब,काळे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अशोक काळे,आर.एम. धारीवाल फाउंडेशनच्या शोभाताई धारीवाल यांच्यासह विविध उद्योगसमूहांनी सामाजिक बांधिलकीतून या संशोधनाला आर्थिक व नैतिक पाठबळ दिले.  मुख्य संशोधक डॉ.शुभम धूत म्हणाले,“'धाराशिव पॅटर्न' हा केवळ वैद्यकीय संशोधन प्रकल्प नसून महाराष्ट्रातून संपूर्ण जगासाठी साकारत असलेले मानवीय, वैज्ञानिक आणि सामाजिक आरोग्य मॉडेल आहे. 


 
Top