भूम (प्रतिनिधी)-  भारतीय स्टेट बँक (एसबीआय) च्या वर्धापन दिनानिमित्त एसबीआयच्या भूम शाखेच्या वतीने बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत झालेल्या शिबिरात तब्बल 40 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

बँकेच्या शाखेसमोरील प्रांगणात आयोजित या शिबिराचे नियोजन भगवंत ब्लड बँक, बार्शी यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. रक्तदानासाठी युवकांसह विविध क्षेत्रातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला. रक्तदान हेच श्रेष्ठ दान असल्याचा संदेश देत अनेकांनी प्रथमच रक्तदान करण्याचा संकल्पही केला. रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी एसबीआयच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी शाखा व्यवस्थापक अभिनव गुल्हाने, फील्ड ऑफिसर सिद्धांत चव्हाण, सर्विस व्यवस्थापक रामेश्वर कांबळे, प्रोबेशनरी अधिकारी अमित मंडल, कॅशियर मनीष वाघमारे यांच्यासह भगवंत ब्लड बँकेचे गणेश जगदाळे, सिद्धिविनायक साबळे, जीवन खरपुडे, शितल जाधव, सोनाली झगडे आणि राजू चौधरी उपस्थित होते.

शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले. रक्तदानामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मोठी मदत होत असून, अशा सामाजिक उपक्रमांमधून समाजात सेवाभाव आणि जनजागृती वाढीस लागते, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. एसबीआय भूम शाखेने सामाजिक उत्तरदायित्व जपत राबविलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

 
Top