तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात कायम चर्चेचा केंद्रबिंदू ठरणारा तुळजापूर तालुका पुन्हा एकदा राजकीय घडामोडींमुळे चर्चेत आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे) गटात प्रवेश केल्यानंतर तालुक्यातील राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. या प्रवेशाचा नेमका फटका महायुतीला बसणार की महाविकास आघाडीला, यावर आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, ओमराजे निंबाळकर यांनी पक्षप्रवेशानंतर पहिल्याच टप्प्यात तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या मूलभूत सुविधांसाठी 5 कोटी रुपयांचा विकास निधी आणल्याने तालुक्यात शिवसेनेचे राजकीय वजन वाढले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी नव्या राजकीय समीकरणांची नांदी झाल्याचे मानले जात आहे. सध्या तुळजापूर तालुक्यात महायुतीमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गट आहे, तर महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचा समावेश आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये या दोन आघाड्यांमध्ये थेट लढत झाली असून त्यात महायुतीने अनेक ठिकाणी बाजी मारली आहे.
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणारा तुळजापूर विधानसभा मतदारसंघ आता भाजपचा मजबूत गड बनला आहे. महायुतीत भाजप हा मोठा भाऊ मानला जात असताना, महाविकास आघाडीत काँग्रेसचे वर्चस्व आहे. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवेळी महाविकास आघाडीतील अंतर्गत विसंवादाचा मोठा फटका बसला आणि महायुतीने सहज सत्ता मिळवली. दरम्यान, ओमराजे निंबाळकर आता शिंदे सेनेत दाखल झाल्याने महायुतीत भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर या दोन प्रभावी नेत्यांमध्ये राजकीय समन्वय कसा राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही नेत्यांचे राजकीय संबंध यापूर्वी फारसे सलोख्याचे नसल्याची चर्चा असल्याने आगामी काळात महायुतीतील अंतर्गत समीकरणे कोणते वळण घेणार, याबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
सध्या दोन्ही नेत्यांचे समर्थक शांत असले तरी तुळजापूरच्या विकासासाठी दोन्ही नेते एकत्र येऊन काम करणार का, की राजकीय संघर्ष अधिक तीव्र होणार, याचे उत्तर येणारा काळच देणार आहे. मात्र विकासाच्या मुद्द्यावर दोन्ही नेते आक्रमक झाल्यास तुळजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकास निधी खेचून आणण्याची स्पर्धा सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दुसरीकडे, ओमराजे निंबाळकर यांच्या जाण्याने महाविकास आघाडीत निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे मोठे आव्हान ठाकरे गट आणि त्यांच्या मित्रपक्षांसमोर उभे राहिले आहे. ही उणीव कशी भरून काढली जाते आणि त्याचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होतो, याकडेही राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. एकंदरीत, ओमराजे निंबाळकर यांच्या नव्या राजकीय वाटचालीमुळे तुळजापूर तालुका पुन्हा एकदा धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला असून, दोन दादांच्या राजकीय केमिस्ट्रीवरच भविष्यातील अनेक समीकरणे अवलंबून राहणार असल्याची चर्चा तालुकाभर रंगू लागली आहे.