तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्रीक्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या रुग्ण , अपंग आणि वृद्ध भाविकांसाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने पुन्हा एकदा मोफत डोली सेवा सुरू केली आहे. या निर्णयामुळे अनेक भाविकांना देवीचे दर्शन सुलभ झाले असून, मंदिर संस्थानच्या या संवेदनशील उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

मंदिर परिसरात सुरू असलेल्या जीर्णोद्धार व विकासकामांमुळे काही काळ डोली सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे विशेषतः रुग्ण, अपंग आणि वृद्ध भाविकांना मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आता ही सेवा पुन्हा सुरू झाल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार, दररोज सुमारे 10 ते 12 अंध, अपंग आणि वृद्ध भाविक या मोफत डोली सेवेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे शारीरिक अडचणी असलेल्या भाविकांनाही सहजपणे श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेणे शक्य होत आहे.

दरम्यान, डोली सेवा बंद असताना या विषयावर मंदिर प्रशासन आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजय गंगणे यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याची घटनाही चर्चेत आली होती. भाविकांच्या सुविधेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने हा विषय काही काळ गाजला होता. या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानने भाविकांची गरज ओळखून मोफत डोली सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अंध, अपंग आणि वृद्ध भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे

 
Top