कळंब (प्रतिनिधी)-  खरीप हंगाम अखेरच्या टप्प्यात आला असतानाही शासनाकडून तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करत ई-पीक पाहणी सुरूच करण्यात आलेली नाही. त्यामुळे हजारो शेतकरी शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करत असून, सरकारच्या ढिसाळ कारभाराविरोधात संतापाची लाट उसळली आहे. ई-पीक पाहणी तात्काळ सुरू करून पूर्ण करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते ॲड. मनोज चोंदे यांनी दिला आहे.

यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच अल्प पाऊस, त्यात बोगस बियाण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. या संकटातून मार्ग काढत शेतकऱ्यांनी कष्टाने उडीद, मूग आणि सोयाबीनची पिके उभी केली. आता उडीद-मूग काढणीच्या उंबरठ्यावर असून सोयाबीनही महिनाभरात तयार होणार आहे. मात्र, अद्यापही ई-पीक पाहणी सुरू नसल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत. ई-पीक पाहणीशिवाय पीक विमा मिळणार नाही. अतिवृष्टी किंवा परतीच्या पावसामुळे नुकसान झाल्यास भरपाई मिळणार नाही, पीक कर्ज मिळणार नाही, तसेच सातबाऱ्यावर पिकाची नोंद नसल्यास शासकीय हमीभाव केंद्रावर सोयाबीन, उडीद व मूग विकताही येणार नाही. त्यामुळे शासनाने स्वतःच बंधनकारक केलेली प्रक्रिया वेळेत न राबवणे हा शेतकऱ्यांवर अन्याय असल्याची भावना व्यक्त होत आहे.


 
Top