भूम,(ंप्रतिनिधी)- भूम तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तथा व्यापारी क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक दिलीप महाराज गाढवे यांना मराठवाडा चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्या वतीने प्रतिष्ठेचा “मराठवाडा व्यापारी भूषण“ पुरस्कार जाहीर झाल्याने भूम तालुक्यासह व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल व्यापारी नागरी सह पतसंस्था मर्यादित, भूम यांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार व अभिनंदन करण्यात आले.
दिलीप महाराज गाढवे यांनी व्यापारी वर्गाच्या हितासाठी सातत्याने केलेले कार्य, व्यापाऱ्यांचे विविध प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडणे, संघटन कौशल्य, सामाजिक बांधिलकी आणि व्यापारी चळवळीत दिलेले मोलाचे योगदान याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भूम तालुक्यात व्यापारी संघटना अधिक सक्षम झाली असून व्यापाऱ्यांमध्ये एकजूट निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
व्यापारी नागरी सह पतसंस्थेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुभेच्छा संदेशात, हा पुरस्कार केवळ दिलीप महाराज गाढवे यांचाच नसून संपूर्ण भूम तालुक्याचा आणि व्यापारी समाजाचा गौरव असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या कार्यामुळे भूम तालुक्याची ओळख मराठवाडाभर अधिक उजळल्याची भावना व्यक्त करण्यात आली. यावेळी गाडवे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे तसेच भविष्यातही व्यापारी, सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रात त्यांच्या हातून अधिक उल्लेखनीय कार्य घडत राहावे, अशा मनःपूर्वक शुभेच्छाही देण्यात आल्या. या गौरवाबद्दल व्यापारी, विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि मित्रपरिवारातून दिलीप महाराज गाढवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
