धाराशिव (प्रतिनिधी)- अध्यापक महाविद्यालय, धाराशिव येथे प्रभारी प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांची केली जाणारी आर्थिक लूट आणि मनमानी कारभाराच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे. शासनाने डीएलएड अभ्यासक्रमासाठी 3,300 रुपये शुल्क निश्चित केलेले असताना, विद्यार्थ्यांकडून 6,500 रुपये उकळले जात आहेत. गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेला हा भ्रष्टाचार थांबवून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आंदोलनाद्वारे लावून धरली आहे.
प्रामुख्याने प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट होत असून शासनमान्य शुल्कापेक्षा 3,200 रुपये जादा वसुली करून विद्यार्थ्यांना लुटले जात आहे. अधिकच्या घेतलेल्या रकमेची कोणती ही पावती दिली जात नाही पावती मागितल्यास विद्यार्थ्यांना धमकावले जाते. जोपर्यंत दोषी प्राचार्यांवर कारवाई होत नाही आणि विद्यार्थ्यांचे पैसे व्याजासह परत मिळत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा अभाविप शहर मंत्री भार्गव मंजुळे यांनी दिला आहे. आंदोलनात अभाविपचे सर्व कार्यकर्ते, विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन अन्यायाविरुद्ध एल्गार पुकारला आहे.
प्राचार्यांना इशारा
आंदोलनादरम्यान शहर मंत्री भार्गव मंजुळे यांनी प्राचार्यांना इशारा दिली आहे, की यावरती तात्काळ उपाययोजना करा, आपण दोषी आढळून आल्यास विद्यार्थ्यांना आपल्याला व्याजासह शुल्क परत करावे लागेल. यावेळी बोलत असताना धाराशिव जिल्हा सह संयोजक साक्षी पाटील यांनी मुलींचे मोफत शिक्षण आणि त्यात ही मुलींचे होणारी दुरावस्था या विषयावरती महाविद्यालय प्रशासनावर गंभीर टीका केली. सर्वसामान्य घरातला विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यासाठी येतो आणि सर्वसामान्य पालकाला लुटण्याचे काम महाविद्यालयाचे प्राचार्य करतात.
