धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त साडे सांगवी गावाला भेट देऊन ग्रामस्थांना दिलेले आश्वासन अखेर प्रत्यक्षात उतरले आहे.पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने साडे सांगवी येथील रस्ता व पुलाच्या बांधकामासाठी 2 कोटी 90 लक्ष 58 हजार रुपये खर्चाच्या कामास प्रशासकीय मान्यता दिली आहे. ग्रामविकास विभागाने 10 जुलै 2026 रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला असून,साडे सांगवीच्या विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

या निर्णयामागे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा निर्णायक ठरला.त्यांनी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांना पत्र पाठवून साडे सांगवी येथील प्रतिमा-1 ते भोगलगाव साडेसांगवी ते इजिमा -11 या ग्राममार्ग क्रमांक 80 वरील पुलाच्या बांधकामासाठी तातडीने निधी मंजूर करण्याची मागणी केली होती.

या पत्रात त्यांनी नमूद केले होते की, सप्टेंबर 2025 मधील अतिवृष्टीमुळे साडे सांगवी येथील रस्त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सप्टेंबर 2025 रोजी भेट देऊन पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्याची सूचना केली.त्यानुसार बांधकाम विभाग,जिल्हा परिषद, धाराशिव यांनी 2 कोटी 90 लक्ष रुपये खर्चाचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे सादर केला होता.या प्रस्तावाला तातडीने मंजुरी मिळावी, अशी विनंतीही पालकमंत्री सरनाईक यांनी संबंधित पत्राद्वारे केली होती. या कामामुळे साडे सांगवीसह परिसरातील नागरिक,शेतकरी, विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवाशांना वर्षभर सुरक्षित व अखंड वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेषतः पावसाळ्यात वाहतुकीसमोरील अडथळे दूर होऊन ग्रामस्थांचा संपर्क अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. 


 
Top