धाराशिव (प्रतिनिधी)- येथील उंबरेकोठा परिसरातील फडकुले प्लॉटमध्ये नुकत्याच बांधण्यात आलेल्या श्री 1008 शांतिनाथ दिगंबर जैन मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यानिमित्त दि. 11 ते 16 जुलै दरम्यान श्री 1008 शांतिनाथ तीर्थंकर दिगंबर जिनबिंब पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
पवन कॉलनी फडकुले प्लॉट येथे हा महाउत्सव होणार आहे. शनिवारी पहाटे सहा वाजेपासून कार्यक्रमाला सुरूवात झाली. कार्यक्रमासाठी अक्षयसागरजी महाराज, निराकुलसागरजी महाराज यांची सहा दिवस उपस्थिती असणार आहे. येत्या सहा दिवसांमध्ये येथे एक लाख भाविक येणार असल्यामुळे पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी भव्य मंडपाचीही उभारणी झाली आहे.
शनिवारी गुरुआज्ञा, नित्याभिषेक, शांतिधारा, पूजन, जप स्थापना, आचार्य श्री यांचे पूजन, तसेच साडेसहा वाजता घटयात्रा, तसेच शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर मंडप प्रवेश, मंडप उद्घाटन, मंडप शुद्धी, वेदी संस्कार, शुद्धी, पात्र शुद्धी, सकलीकरण, नंदी विधान, इंद्रप्रतिष्ठा करण्यात आली. दुपारी 12:30 वाजता श्री स्थापना, पूजन, ध्वजारोहण, यागमंडळ विधान व मुनीशांच्या प्रवचन झाले. रविवारी (दि. 12) याच पद्धतीने कार्यक्रम होऊन प्रवचन, तसेच सायंकाळी नाभीराज राजदरबार, स्वप्न फळकथन, अष्टकुमारीकांद्वारे मातेची सेवा, 56 कुमारीकांद्वारे भेट समर्पण होईल. सोमवारी जन्म कल्याणकानिमित्त संगीतमय महारथी, विशाल जन्माभिषेक यात्रा, पांडूकशिलावर कार्यक्रम होतील. सर्व कार्यक्रम सकाळी सहा वाजता सुरू होणार आहेत.
माता-पिता होण्याचा मान सरिता व धर्मेंद्र जैन यांना
यावेळी भगवंताचे माता-पिता होण्याचा सन्मान सरिता व धर्मेंद्र जैन यांना देण्यात आला आहे. तसेच सौधर्म इंद्र रेखा व रमेश फडकुले, कुबेर इंद्र ज्योती व उल्हास चाकवते, महायज्ञनायक इंद्र कल्पना व सुदेश फडकुले, यज्ञानायक इंद्र राजश्री व प्रसन्न फडकुले, राजा श्रेयांश इंद्र पद्मजा व प्रशांत जैन, ईशान इंद्र संगीता व राजेंद्र फडकुले, प्रतिंद्र इंद्र अर्चना व प्रणव अडकले, महामंडलेश्वर राजा माही व मंथन उदगीरकर, श्वेता व सागर दुरूगकर, उज्वला व महावीर दुरुक्कर, स्वर्ण सौभाग्यवती होण्याचा मान रश्मी अक्षय शहरकर यांना मिळाला आहे.
