धाराशिव (प्रतिनिधी)-  मुंबई येथील नंदनवन येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांची धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न तसेच जनहिताच्या मागण्यांचे निवेदन उपमुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले.

यामध्ये धाराशिव जिल्ह्याच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या कृष्णामराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत 7 टीएमसी पाणीपुरवठा योजनेसाठी 5 हजार कोटी रूपयांची आर्थिक तरतूद करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. 

खासदार राजेनिंबाळकर यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, धाराशिव हा केंद्र शासनाच्या आकांक्षी जिल्ह्यांच्या यादीत समाविष्ट असून, सातत्याने दुष्काळ व पाणीटंचाईचा सामना करणारा जिल्हा आहे. शेती, पिण्याचे पाणी, उद्योग आणि सर्वांगीण विकासासाठी कायमस्वरूपी जलस्रोत उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी कृष्णामराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत धाराशिव जिल्ह्यास 7 टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याची योजना अत्यंत महत्त्वाची असून, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुमारे 5,000 कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा राष्ट्रीय प्रकल्प म्हणून समावेश करण्यात यावा तसेच केंद्र शासनाच्या आर्थिक सहकार्याने आवश्यक निधी उपलब्ध करून हा प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी खासदार राजेनिंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्याच्या पाणीप्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना तातडीने बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या. तसेच 7 टीएमसी पाणीपुरवठा योजना व कृष्णामराठवाडा सिंचन प्रकल्पाबाबत सविस्तर आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.


 
Top