धाराशिव (प्रतिनिधी)- कवी राजेंद्र अत्रे यांची अतिशय गाजलेली कविता 'झुडूप खुरटे' आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या बी. ए., बी. एस्सी व बी. कॉम. च्या मराठी विषयाच्या तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात जून 2026 पासून समाविष्ट झाली आहे. याबद्दल त्यांच्यावर समाजातल्या विविध स्तरातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वृत्तीत सकारात्मकता ठेवून जीवनाशी झुंजत राहणाऱ्या ध्येयवेड्या व्यक्तीचे जगणे त्यांनी या कवितेत खुरट्या झुडुपाच्या प्रतिकातून कलात्मकतेने मांडले आहे.
याशिवाय केंद्रीय शैक्षणिक नव्या धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमात जून 2026 पासून 'कलाशिक्षणाच्या' इयत्ता चौथीच्या पुस्तकात त्यांच्या एका कवितेचा तर इयत्ता तिसरीच्या पुस्तकात दोन कवितांचा समावेश झाला असून या कवितांचा इतर सात भाषांमधून अनुवाद झाला आहे.
या बरोबरच गोवा राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात इयत्ता सातवीच्या अभ्यासक्रमातही त्यांच्या कवितेचा समावेश झाला आहे. यापूर्वीही त्यांच्या कवितांचा समावेश इयत्ता पाचवी, इयत्ता सातवी आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या एम. ए. (मराठी) द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात झालेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अभ्यासक्रमात कवितांचा समावेश झालेले कवी राजेंद्र अत्रे हे बहुधा महाराष्ट्रातले एकमेव मराठी कवी असावेत.
