धाराशिव ता. 9: धाराशिव येथे स्वतंत्र विद्यापीठ उभारावे अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात केली. त्यावर उच्च तंत्र शिक्षणमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देत नक्की विचार करु अस आश्वासन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. शिवाय मराठा समाजास ओबीसी प्रमाणे सवलती देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, मुलींना मोफत शिक्षण असूनही अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने फी वसूल केली जात असल्याचेही सरकारला दाखवून दिले.
यावेळी आमदार पाटील म्हणाले की, धाराशिव येथे विद्यापीठ उपकेंद्र आहे हे केंद्र राज्यात सर्वात सक्षम असून अनेक विद्यार्थ्यांना कामासाठी साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासूनची विद्यापीठाची मागणी सरकारने मान्य करावे अशी अपेक्षा आमदार पाटील यांनी सरकारकडे केली. यावर उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याबाबतीत नक्की विचार केला जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
मराठा समाजा ओबीसी प्रमाणे सर्व सवलती देण्याबाबत शासन निर्णय झाला आहे मात्र त्या निर्णयाचा अवलंब अजूनही होत नसल्याचे त्यांनी सभागृहास निदर्शनास आणून दिले. या निर्णयाच्या अंमलबजावणी तातडीने होणे आवश्यक आहे अशी मागणी पाटील यांनी केली. त्याचबरोबर मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय होऊनही छुप्या पद्धतीने फी आकारली जात आहे. अशा संस्थांवर सरकारने कारवाई करून मुलींना मोफत शिक्षण मिळण्यास मदत करावी.
पुढे बोलताना पाटील म्हणाले की, सोलर पंप बसवल्यामुळे पारंपारिक पंप बंद करण्याची सक्ती करू नये. जुन्या पंपाच्या आधारे अधिक क्षमतेने पाणी उपसा करणे शक्य होते ते सोलर च्या माध्यमातून होत नाही ही वस्तुस्थिती असून सरकारने ती मान्य करावी. सोलर पंप बसवण्याबद्दल हरकत नाही पण पारंपारिक पंप कनेक्शन बंद करण्याची सक्ती करू नये. सोलर पंप बसवताना अनेक अडचणी येत आहेत यावरही आमदार कैलास पाटील यांनी बोट ठेवले. काम दिलेल्या एजन्सी कुठे आहेत याची माहिती नाही, स्थानिक खाजगी माणूस काम करतो पण नंतर कंपनी सोडल्याचे कारण सांगतो. मग अश्या वेळी शेतकऱ्यांनी कंपनीला शोधायचं कुठे हा प्रश्न निर्माण होतो. विमा असूनही त्याची दुरुस्ती करण्यात अडचणी येत आहेत अश्या गोष्टी पाटील यांनी सरकारला अवगत करून दिल्या