भूम, (प्रतिनिधी) : शहरातील मध्यवर्ती भागातील कसबा पेठ येथून जाणाऱ्या बाणगंगा नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूंचे लोखंडी संरक्षण कठडे महापुराच्या पाण्यात वाहून गेल्यानंतर अनेक महिने उलटूनही त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, पादचारी तसेच दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून या पुलावरून प्रवास करावा लागत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात बाणगंगा नदीला आलेल्या महापुरात पुलावरील दोन्ही बाजूंचे लोखंडी सुरक्षा कठडे तुटून वाहून गेले होते. त्यानंतर संबंधित विभागाकडून अथवा नगरपरिषद प्रशासनाकडून नवीन कठडे बसविण्याचे काम अद्यापही करण्यात आलेले नाही. परिणामी पुलाच्या दोन्ही बाजूंना कोणतेही संरक्षण नसल्याने अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.

विशेष म्हणजे सुमारे दीड महिन्यापूर्वी कसबा परिसरातील एका नागरिकाचा पुलावरून तोल जाऊन नदीत पडल्याची घटना घडली होती. या अपघातात संबंधित नागरिक जखमी झाला होता. ही घटना घडल्यानंतर तरी प्रशासन जागे होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती. मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

बाणगंगा पूल हा शहरातील महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग असून दररोज शेकडो विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वार या पुलाचा वापर करतात. संरक्षण कठडे नसल्याने पुलाच्या कडेला थोडीशी चूक झाली तरी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः पावसाळ्यात तसेच रात्रीच्या वेळी अपुऱ्या प्रकाशामुळे धोका अधिक वाढत असल्याचे नागरिक सांगत आहेत.

स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नगरपरिषद प्रशासन आणि संबंधित विभागाकडे नवीन सुरक्षा कठडे बसविण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप होत आहे. शहराच्या मध्यभागातील एवढ्या महत्त्वाच्या पुलाकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष नागरिकांच्या सुरक्षेशी खेळणारे असल्याची भावना व्यक्त होत आहे.

नागरिकांनी पुलावरील तुटलेले कठडे तातडीने बसविणे, पुलाची सुरक्षितता तपासणे, रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशव्यवस्थेची सोय करणे आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होण्यापेक्षा त्यापूर्वीच आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी आता कसबा पेठ परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top