धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना केशेगाव या कारखान्याने सहकार रत्न अरविंद गोरे यांच्या नेतृत्वाखाली गाळप केलेल्या हंगाम 25-26 साठी ऊस देऊन सहकार्य केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर गळीतास आलेल्या उसासाठी दुसरा हप्ता प्रति टन 150 प्रमाणे बिल पेरणीसाठी म्हणून संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत.
पेरणीसाठी योग्य वेळी कारखान्याने ऊस बिल आदा केल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण झाले असून कारखान्याच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आज रोजी सत्तेत असणाऱ्या काही कारखान्यावर बिल न दिल्यामुळे जप्तीची कारवाई होत असताना कारखान्याने गोरे दादांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने नियोजन करून कारखाना चालवल्यामुळे आपण शेतकऱ्याला वेळेवर पेरणीसाठी ऊस बिल अदा करू शकलो अशी माहिती कारखान्याचे संचालक ॲड. निलेश बारखडे पाटील यांनी माध्यमांना बोलताना दिली. तसेच परिसरामध्ये सर्व शेतकरी सुखावण्यासाठी निसर्गाची कृपा होऊन समाधानकारक पाऊस येणाऱ्या पुढील काळात पडावा अशी अपेक्षाही त्यांनी या निमित्ताने व्यक्त केली.
