तुळजापूर  (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरातील जवाहर गल्ली परिसरातील अनेक वर्र्षाचे वडाचे झाड तोडण्यात आल्याच्या प्रकारावरून संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते जयकुमार नागनाथ पांढरे यांनी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनानुसार, सुमारे सहा ते सात वर्षांपूर्वी स्थानिक नागरिकांनी पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक हित लक्षात घेऊन वडाचे झाड लावले होते. परिसरातील नागरिक, विशेषतः महिलांनी या झाडाची जिवापाड काळजी घेतली होती. मात्र जंगम मठ ट्रस्ट आणि बांधकाम ठेकेदाराकडून व्यापारी संकुलाच्या बांधकामादरम्यान कोणतीही पूर्वपरवानगी न घेता हे झाड तोडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आषाढातील पवित्र वटसावित्री व्रताच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेले वडाचे झाड तोडण्यात आल्याने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील महिलांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. निवेदनात नगरपरिषदेच्या हद्दीतील वृक्षतोडीसाठी संबंधितांना परवानगी कोणी दिली? आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली होती का? याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

वृक्षतोडीसाठी कायदेशीर परवानगी होती का, याची चौकशी करावी. संबंधितांन नियमानुसार कारवाई करावी. पर्यावरणाची हानी भरून काढण्यासाठी त्याच ठिकाणी मोठे वडाचे झाड किंवा पर्यायी वृक्षांची लागवड करावी. संबंधित ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिक व महिलांची लेखी माफी मागावी. अन्यथा परिसरातील महिला व नागरिक लोकशाही मार्गाने आंदोलन छेडतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शहरात पर्यावरण संरक्षण, धार्मिक भावना आणि वृक्षतोडीच्या नियमांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नगरपरिषद प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


 
Top