तुळजापूर (प्रतिनिधी)- खरीप हंगाम 2025 च्या पीकविम्याची रक्कम अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नसताना, खरीप हंगाम 2026 साठी पीकविम्याचा हप्ता भरण्याची वेळ आली आहे. मागील वर्षाचा विमा मिळाला नसल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नवीन पीकविम्याचा हप्ता भरणे कठीण झाले असून, शासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी भाजप नेते मकरंद लबडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात खरीप 2025 मधील नुकसानभरपाईचा प्रश्न प्रलंबित असताना खरीप 2026 च्या पीकविम्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे भरण्याची अपेक्षा करणे अन्यायकारक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शासनाने खरीप 2026 च्या पीकविम्याचा हप्ता तात्पुरता स्वतः भरावा. त्यानंतर खरीप 2025 च्या पीकविम्याचा निकाल लागून शेतकऱ्यांना विमा रक्कम मंजूर झाल्यास, त्यातून 2026 च्या विम्याचा हप्ता वजा करावा. उर्वरित रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
गतवर्षीच्या पावसातील अनिश्चितता, उत्पादनातील घट आणि बाजारभावातील चढ-उतारामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे बियाणे, खते, मशागत आणि इतर खरीप हंगामाच्या खर्चासाठीही पुरेसा निधी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत पीकविम्याचा हप्ता भरण्याचा अतिरिक्त भार शेतकऱ्यांवर पडत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.