धाराशिव (प्रतिनिधी)-  पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना दरवर्षी बसणाऱ्या पुराच्या तडाख्यातून मुक्त करून ते समुद्राला वाहूंजनारे अतिरिक्त पाणी दुष्काळी मराठवाड्याकडे वळवण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आखलेल्या महत्त्वाकांक्षी योजनेला आता गती मिळाली आहे. या प्रकल्पाचा 'व्यवहार्यता अहवाल'सकारात्मक आल्यानंतर, आता आपल्या महायुती सरकारने'सविस्तर प्रकल्प अहवाल' तयार करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यासाठी 24 कोटी पाच लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. धाराशिव, लातूर आणि सोलापूरसह संपूर्ण मराठवाड्याचा दुष्काळी प्रश्न यामुळे पुर्णतः पुसून निघणार आहे. मराठवाड्याच्या दुष्काळी प्रश्नासाठी हे एक मोठे उत्तर ठरणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

कृष्णा खोऱ्यात पावसाळ्यात अतिरिक्त होणारे आणि समुद्राला वाहून जाणारे 50 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे मराठवाड्याच्या दिशेने वळवण्यात येणार आहे. कोल्हापूर-सांगली भागातील पुराचे संकट टाळून हे पाणी दुष्काळी भागातील सिंचनासाठी आणि पिण्यासाठी वापरण्याचे मोठे नियोजन आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी आग्रही आहेत. या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील अत्यंत दुष्काळी मानल्या जाणाऱ्या धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. सोबतच शेजारच्या सोलापूर जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रालाही याचा मोठा फायदा होणार आहे. यापूर्वी तांत्रिकदृष्ट्या हे पाणी वळवणे शक्य आहे का, याचा अभ्यास करण्यासाठी जागतिक बँकेची तांत्रिक सल्लागार असलेल्या ‌‘ट्रॅकबेल' या संस्थेने अभ्यास करून व्यवहार्यता अहवालात सकारात्मक दिला आहे. 

 
Top