धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरातील प्रलंबित नागरी विकासकामांना गती देण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागामार्फत तुळजापूर नगरपरिषदेसाठी विविध विकासकामांसाठी सुमारे 5 कोटी (4.45 कोटी + 55 लाख) निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांचे मजबुतीकरण, काँक्रीटीकरण, भूमिगत गटारे व नाल्यांची उभारणी, पावसाच्या पाण्याचा निचरा तसेच इतर आवश्यक नागरी विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांमुळे तुळजापूर शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधांचा मोठा लाभ होणार असून शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.महाराष्ट्र शासनाने 17 जुलै 2026 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार, रस्ता अनुदान (अनिवार्य) योजनेअंतर्गत तुळजापूर नगरपरिषदेसाठी 4.45 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत 55 लाख निधी मंजूर करण्यात आला आहे.
तुळजापूर शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांमुळे शहरातील अनेक प्रलंबित विकासकामे आता मार्गी लागणार असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठी सुविधा निर्माण होणार आहे. याबद्दल खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब , उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे आभार व्यक्त केले असून मंजूर झालेली सर्व कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
