तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूर नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या अजेंड्यावर तब्बल 39 विषय ठेवण्यात आले होते. जंगम मठासमोरील जागेवरील प्रस्तावित दुकाने व बांधकाम, भवानी कल्लोळतीर्थ येथील गाळ्यांचा ई-लिलाव, 15 व्या वित्त आयोगातून मिळालेल्या 12 कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन, शहरातील भूमिगत ड्रेनेज, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते-नाल्या, पाणीपुरवठा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. काही प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. तर काही विषय पुढील तपासणी व अहवालासाठी स्थगित ठेवण्यात आले.

सभेत सर्वाधिक चर्चा जंगम मठासंदर्भातील विषयावर झाली. जंगम मठ परिसरातील जागेचे अतिक्रमण, स्थळपाहणी अहवाल आणि संबंधित बांधकाम परवानग्यांबाबत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आक्षेप नोंदविला. या प्रकरणातील कागदपत्रांची संपूर्ण तपासणी करून अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला. भवानी कल्लोळतीर्थ परिसरातील गाळ्यांच्या ई-लिलाव प्रक्रियेवरही विस्तृत चर्चा झाली. संबंधित जागा सुमारे 137 मीटर लांबीची असून येथे दुकाने विकसित करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत नगरपरिषदेला 12 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून या निधीतून घनकचरा व्यवस्थापनासाठी कंपोस्टिंग मशीन, आवश्यक पायाभूत सुविधा आणि इतर विकासकामांचे नियोजन करण्याबाबत चर्चा झाली. निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणारे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करणारा ठरावही सभेत मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे.

सभेत पाच अनुभवी मार्गदर्शकांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला; मात्र विरोधी पक्षातील चार नगरसेवकांनी त्यास आक्षेप घेतला.  केबल भूमिगत करणे, नव्या नाट्यगृहासाठी जागा निश्चित करणे, महाद्वार व भवानी कुंड परिसरात मोबाईल क्लॉक रूम, शिवाजी महाराज चौकातील शॉपिंग कॉम्प्लेक्स, कचरा व्यवस्थापनासाठी जागा निश्चित करणे आणि जुन्या कन्या प्रशालेतील वडाच्या झाडाचे सुशोभीकरण यावरही चर्चा झाली.  

 
Top