तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यात जलसंधारण विभागामार्फत कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या गेटेड बंधाऱ्यांच्या कामांबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाल्याचे दाखवून ठेकेदारांनी बिले उचलली. मात्र प्रत्यक्षात गेट बसविण्यात आलेले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक व तक्रारदारांकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी ठेकेदार वरिष्ठ अधिकाऱ्यांना कुठल्या रूपात आपलेसे करून घेत आहे हे जनतेला कळेल असे झाल्याने या प्रकरणी संबंधित विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यावरही कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी जलसंधारण विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्याने सर्व गेटेड बंधाऱ्याचे तपासणी करून यात दोषी आढळणाऱ्या ठेकेदार अभियंता अधिकाऱ्यापर्यंत कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सरकारी तिजोरीतून लाखो-कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाल्याचे कागदोपत्री दाखवले जात असताना प्रत्यक्ष स्थळावर गेटच नसल्याने जलसंधारण विभागाच्या कार्यपद्धतीवर संशयाचे ढग दाटले आहेत. विशेष म्हणजे संबंधित ठेकेदार आणि विभागातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमतातून हा प्रकार घडल्याचा आरोप होत असून याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेटेड बंधाऱ्यांचा मुख्य उद्देश पाणी अडवून भूजल पातळी वाढविणे हा असतो. मात्र गेटच नसल्याने शासनाचा निधी वाया गेला असून शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळालेला नाही. अनेक ठिकाणी काम पूर्ण झाल्याचे दाखवून देयके मंजूर करण्यात आली, परंतु प्रत्यक्ष पाहणी केल्यास वास्तव वेगळे असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.
“कागदावर विकास, प्रत्यक्षात शून्य?“
गावोगावी विकासकामांचा गाजावाजा केला जात असताना प्रत्यक्षात गेटेड बंधाऱ्यांचे गेट गायब असल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे “कागदावर विकास आणि प्रत्यक्षात शून्य“ अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
चौकशीची मागणी
या प्रकरणात संबंधित कामांची प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, मोजमाप पुस्तिका, बिले, पूर्णता प्रमाणपत्रे आणि प्रत्यक्ष स्थळ पाहणी यांची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. दोषी आढळणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करून शासनाच्या निधीची वसुली करावी, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.
