तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी मराठवाडा जनता विकास परिषदेची केंद्रीय कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक येत्या रविवार, दि. 19 जुलै रोजी सकाळी 11 वाजता तुळजाभवानी महाविद्यालय, तुळजापूर येथे होणार आहे. या बैठकीत मराठवाड्यातील विकासाच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करून शासनाकडे ठोस मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष प्रा. धनंजय लोंढे यांनी दिली.
बैठकीसाठी मराठवाड्यातील सर्व जिल्हे व महानगरांचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. मराठवाड्यातील रस्ते, शेती, पाणी, शिक्षण, आरोग्य, उद्योग, प्रस्तावित रेल्वे मार्ग, विमान सेवा, सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न, प्रकल्प आराखडे, आर्थिक अनुशेष आदी ज्वलंत विषयांवर व्यापक चर्चा होणार आहे. बैठकीतून मराठवाड्याच्या विकासासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावेत, यासाठी एकमुखी भूमिका निश्चित करण्यात येणार असून त्यासंदर्भातील निवेदन महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
या बैठकीला परिषदेचे मार्गदर्शक माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे, माजी आमदार डी. के. देशमुख तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक शंकरराव नागरे उपस्थित राहणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, सरचिटणीस प्रा. अर्जुन जाधव आणि तालुकाध्यक्ष प्रा. धनंजय लोटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.