धाराशिव (प्रतिनिधी)-  छत्रपती संभाजीनगरसोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील येडशीजवळील आळणी चौकात बुधवारी (दि. 29) रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात उमरगा तालुक्यातील बोरी येथील दोन भाविकांचा मृत्यू झाला, तर अन्य 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव हायवा कंटेनरने पिकअप वाहनाला दिलेल्या जोरदार धडकेत पिकअपचे अक्षरशः दोन तुकडे झाले. या भीषण अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली.

या अपघातात छबू दुधभाते (वय 40, रा. बोरी, ता. उमरगा) आणि बब्रुवान सूर्यवंशी (वय 65, रा. बोरी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अन्य 17 जण जखमी असून त्यांच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उमरगा तालुक्यातील बोरी येथील भाविक पुणे ते शिर्डी या पायी वारी पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. बुधवारी गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी येथे श्री साईबाबांचे दर्शन घेऊन सर्व भाविक पिकअप (एमएच-25-पी-4003) मधून आपल्या मूळ गावी बोरीकडे परतत होते. दरम्यान, पिकअप आळणी चौकातून जात असताना ढोकीच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या हायवा ट्रकने (एमएच-17-सीव्ही-2665) पिकअपला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की पिकअप वाहनाचे दोन तुकडे झाले. अपघातानंतर घटनास्थळी एकच आक्रोश उसळला. वाहनातील सर्व प्रवासी जखमी झाले असून अनेकांना गंभीर दुखापती झाल्या.

घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि त्वरित उपलब्ध करण्यात आलेल्या रुग्णवाहिकांद्वारे सर्व जखमींना धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असल्याने उपचारासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. या भीषण अपघातामुळे बोरी गावावर शोककळा पसरली असून शिर्डीहून आनंदाने परतणाऱ्या साईभक्तांवर काळाने घाला घातल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.


 
Top