भूम (प्रतिनिधी)- भूम नगर परिषदेतील कारभारावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून मुख्याधिकारी शैला डाके यांच्या विरोधात 15 नगरसेवकांनी गंभीर आरोप करत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. या निवेदनात कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी, विशेष लेखापरीक्षण तसेच नगरसेवकांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार, मागील दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, नाले आणि इतर विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात अनेक वेळा लेखी तक्रारी देऊनही अद्याप कोणतीही सखोल चौकशी करण्यात आलेली नसल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, 6 जुलै 2026 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत मुख्याधिकारी यांच्या कारभाराविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर मुख्याधिकारी यांनी नगरसेवकांविरोधात खोट्या तक्रारी करून त्यांना अपात्र करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या सर्व घडामोडींमुळे नगरसेवकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांच्यावर दबाव टाकून प्रकरणे दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रशासक कालावधीतील सर्व कामांची सखोल चौकशी, विशेष ऑडिट, संबंधित अधिकाऱ्यांच्या कॉल डिटेल्सची तपासणी तसेच सर्वसाधारण सभेदरम्यान पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे भूम नगर परिषदेत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
