तेर (प्रतिनिधी)- कृषी महाविद्यालय, आळणी यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत तेर येथे शेतकऱ्यांसाठी बियाणे प्रक्रिया विषयावर मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी पेरणीपूर्वी बियाण्यांवर योग्य प्रकारे प्रक्रिया करण्याचे महत्त्व, त्यामागील शास्त्रीय कारणे तसेच बुरशीनाशक, जैविक घटक व इतर शिफारस केलेल्या घटकांच्या साहाय्याने बियाणे प्रक्रिया करण्याची शास्त्रोक्त पद्धत कृषीदूतांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना समजावून सांगितली. बियाणे प्रक्रियेमुळे बियाणे व मातीजन्य रोगांपासून संरक्षण मिळते, उगवण चांगली होते तसेच पिकांच्या सुरुवातीच्या वाढीस चालना मिळून उत्पादनवाढीस मदत होते, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

या उपक्रमास रामकिसन कदम, नारायण कदम, दत्ता आंधळे, पांडुरंग कचरे, देविदास गायके, हिराचंद भोरे, अमोल नाईकवाडी यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत बियाणे प्रक्रिया, रोग व्यवस्थापन व पेरणीपूर्व तयारीसंदर्भात विविध प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. यावेळी कृषीदूत हर्ष वाघ, समर्थ पाटील, आनंद वीर, ज्ञानसागर पवार, स्वप्निल पासले, शिवम शेळके, रोहित पाटील, योगेश सवने व ऋषिकेश करडे हे उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये शास्त्राधारित शेती पद्धतींबाबत जनजागृती करण्यात आली असून पेरणीपूर्व बियाणे प्रक्रियेचे महत्त्व पटवून देत निरोगी व जोमदार पिकांसाठी आवश्यक तांत्रिक माहिती देण्यात आली.


 
Top