धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उस्मानाबाद लातूर बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026 च्या आज 22 जून रोजी झालेल्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार बसवराज माधवराव पाटील यांनी विजय मिळविला.पाटील यांना एकूण 844 मते मिळाली,तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे महेश माणिकराव देशमुख यांना 125 मते मिळाली.त्यामुळे बसवराज पाटील यांनी तब्बल 719 मतांच्या फरकाने विजय संपादन केला.
मतमोजणीच्या अंतिम निकालानुसार भाजपाच्या बसवराज माधवराव पाटील यांना टेबल क्रमांक 1 वर 184,टेबल क्रमांक 2 वर 144,टेबल क्रमांक 3 वर 191,टेबल क्रमांक 4 वर 177 आणि टेबल क्रमांक 5 वर 148 अशी एकूण 844 मते मिळाली. दुसरीकडे महेश माणिकराव देशमुख यांना अनुक्रमे 10, 55, 6, 21 आणि 33 अशी एकूण 125 मते मिळाली. मतमोजणीदरम्यान 14 मते अवैध ठरली. त्यामध्ये टेबल क्रमांक 1 वर 6, टेबल क्रमांक 2 वर 1, टेबल क्रमांक 3 वर 3, टेबल क्रमांक 4 वर 2 आणि टेबल क्रमांक 5 वर 2 अवैध मतांचा समावेश होता. या निवडणुकीत एकूण 983 मतपत्रिका प्राप्त झाल्या.त्यापैकी 14 मते अवैध ठरल्याने 969 वैध मते ग्राह्य धरण्यात आली. निवडून येण्यासाठी आवश्यक कोटा 485 मतांचा होता. बसवराज पाटील यांनी हा कोटा सहज पार करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
त्यानंतर विजय उमेदवार बसवराज पाटील यांना भारत निवडणूक आयोगाचे विजयी प्रमाणपत्र जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार सुरेश धस, शरण पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, मल्हार पाटील, नितीन काळे, रामदास कोळगे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
