पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, परंडा रोड परिसरातील महादेव पंकजकर मुंढे (वय २२) हे २ जून रोजी साडेनऊच्या सुमारास कामासाठी मोटारसायकलवरून भूम शहरात आले होते. परंडा रोडवरील प्रतीक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबले असता तेथे आरोपी श्रीराम उर्फ गोलू साठे व अमीर शेख उपस्थित होते.
यावेळी आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करून वाद घातला. फिर्यादीने विरोध केल्यानंतर श्रीराम साठे याने हातातील कोयत्याने फिर्यादीच्या डाव्या कानाजवळ व डोक्यावर वार केला. तसेच अमीर शेख यानेही कोयत्याने मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
दरम्यान, याच रात्री आरोपींनी भूम शहरातील पी.व्ही.सी. पाईप उत्पादन करणाऱ्या एका कारखान्याच्या गोदामात जाऊन ज्वलनशील पदार्थ ओतून तेथील साहित्याला आग लावल्याचा आरोप केला आहे. या घटनेत गोदामातील साहित्याचे नुकसान झाले.
त्यानंतर आरोपींनी आयटीआय कॉलेजसमोरील ‘हॉटेल ’समोरील बॅनर फाडून टाकले. तसेच पुढे सार्वजनिक बांधकाम विभागाने लावलेले साईन बोर्ड व शासकीय विभागासमोरील पथदिव्यांची तोडफोड केल्याची नोंद फिर्यादीत करण्यात आली आहे.
एका रात्रीत शहरातील विविध ठिकाणी घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींविरुद्ध मारहाण, जाळपोळ, मालमत्तेचे नुकसान व दहशत निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास भूम पोलीस करीत आहेत.