तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप देतानाच गेट, इनोव्हेशन, इंटर्नशिप मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार 
(बासरीने झाली फेअरवेलची सुरुवात )

धाराशिव, (04/06/2026): धाराशिव येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक शास्त्र अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना नुकताच निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात अंतिम वर्षाचा विद्यार्थी जगदीश सुतार याने केलेल्या सुमधुर बासरी वादनाने झाली. त्यानंतर शेख नयूम, अल्सफा अरब, जगदीश सुतार व माने अभिजित यांनी महाविद्यालयातील चार वर्षांतील विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर आठवणी उजागर करत उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणले.
संगणक अभियांत्रिकी शाखेच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी एका भव्य निरोपसमारंभाचे (फेअरवेल) आयोजन केले होते. या प्रसंगी विभागप्रमुख प्रा. सुजाता गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना शुभसंदेश देताना म्हटले की, "नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेतलात तर उद्याचे जग तुमचेच आहे."
महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग या विभागाचे विद्यार्थी नेहमीच आपल्याला स्वतःला अद्यावत करत आहेत त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांची चांगल्या कंपनीत निवड झाली असून हे विद्यार्थी नक्कीच भविष्यात उंच भरारी घेतील असा विश्वास व्यक्त करून, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने यांनी विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. 
विभागप्रमुख प्रा. सुजाता गायकवाड यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात स्वतःला सतत अपडेट ठेवून समाजासाठी सकारात्मक योगदान देण्याचे आवाहन केले. विभागातील वरिष्ठ प्राध्यापक प्रा. डी. बी. भक्ते यांनीही विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमास उपस्थित बी. फार्मसी विभागप्रमुख डॉ. प्रीती माने यांनी नाविन्यपूर्ण कल्पनांनी शेतकरी, नवयुवक व सर्वसामान्यांसाठी सॉफ्टवेअर तयार करण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी गेट परीक्षेत उज्वल यश मिळवलेल्या शेख समीर, इनोव्हेशनसाठी उत्कर्ष म्हात्रे तसेच विविध इंटर्नशिप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख समीरने केले.

या निरोपसमारंभाला संगणक विभागातील डॉ. होळंबे, प्रा. भक्ते, प्रा. वाकुरे, प्रा. बोंडगे, प्रा. पाटील, तसेच श्री. वडगावकार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तृतीय वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
 
Top