भुम (प्रतिनिधी)- परांडा तालुक्यातील हिंगणगाव (बुद्रुक) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रीय वाचन दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि वाचन संस्कृती जोपासली जावी या उद्देशाने लेखक किरण विभूते लिखित इंग्रजी विषयाची पुस्तके विद्यार्थ्यांना भेट म्हणून देण्यात आली.
तसेच “वाचाल तर वाचाल“ या संदेशाला अनुसरून घोषवाक्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करणारी विविध आकर्षक व प्रेरणादायी घोषवाक्ये सादर केली. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शालेय शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात वाचनाचे महत्त्व, पुस्तकांचे जीवनातील स्थान आणि नियमित वाचनामुळे होणारे व्यक्तिमत्त्व विकास याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना अधिकाधिक पुस्तके वाचण्याचे आवाहन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऐश्वर्या नवले हिने केले तर आभार प्रदर्शन आरोही समिंदर हिने केले.
