धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्ह्यात अवैध व्यवसायांचे कंबरडे मोडण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत पोलीस प्रशासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक  रीतु खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, परि.पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांचा पथकाने कळंब परिसरातील एका मोठ्या प्रमाणात चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाडसी छापेमारी केली. या कारवाईत तब्बल 59 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, 19 लाख 96 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

कळंब-ढोकी रोडवरील संदीप कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ येथे क्लब नोंदणीच्या परवान्याचा गैरवापर करून, सर्व नियम धाब्यावर बसवून अत्यंत पद्धतशीरपणे तीन पत्ती (तिरट) हा जुगार चालवला जात होता. या अड्ड्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळताच, पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांनी अत्यंत गुप्तपणे सापळा रचून स्वतः या मोहिमेचे नेतृत्व केले. त्यांच्या विशेष पथकाने रात्रीच्या वेळी अचानक छापा टाकून संपूर्ण जुगार अड्डा उद्ध्वस्त केला.

पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे जुगार बहादरांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनास्थळावरून 54 जणांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये जुगार खेळणारे आणि क्लबचे 5 संचालक अशा तब्बल 59 जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम चे कलम 4 आणि 5 अन्वये कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईदरम्यान पोलिसांनी जुगाराच्या साहित्यासह, रोख रक्कम,मोबाईल, चारचाकी आणि दुचाकी वाहने असा एकूण 19 लाख 96 हजार 50 रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. पोलीस उपअधीक्षकांच्या थेट नेतृत्वाखालील या यशस्वी कामगिरीत सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी, सुरेश कासुळे, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र बहुरे तसेच आरसीपी आणि क्यूआरटी या विशेष पथकांतील अंमलदार व चालकांनी महत्वाची भूमिका बजावली.


 
Top