भुम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी किंवा गावा बाहेर शेती, वाडी, मळे यांना जोडणारा लहान सर्वजनिक रस्ता, सर्वांना व्यवस्थित जाण्यायोग्य करण्यासाठी पाणंद रस्ते योजना, शासनातर्फे मंजूर करण्यात आली. परंतु ईट व परिसरातील 15 गावात, एकही रस्ता झाला नाही. गाव नकाशा व त्यावरील सर्वे नंबर वर रस्त्याचे नियोजन करून, अहवाल तहसील कार्यालयात पडून आहेत. सदरील रस्ते हे मार्च ते जून पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. पावसाळा हंगाम सुरू होण्यापूर्वी ते पूर्ण तयार करणे, महसूल विभागाची जिम्मेदारी होती. परंतु नियोजनाचा अभाव कामाचा कंटाळा व फायली थांबून ठेवणे, हे महसूल विभागाचे आवडते काम. हे त्यांनी एक ही रस्ता न करता तसे दाखवूनच दिले आहे. त्यामुळे लाल फितीच्या कारभारामुळे पाणंद रस्ते वाऱ्यावर उडून गेले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सरकारच्या विविध योजना ग्रामीण भागातील लोकांसाठी समाज उपयोगी असतात. परंतु कामाची टाळाटाळ करणे, फाईलकडे दुर्लक्ष करणे यामुळे पाणंद रस्त्याची कामे होवू शकले नाहीत. आता पावसाळा चालू झाला आहे. आता कामे कसे? होणार, शेतात खते, बी अवजारे कसे नेणार? या समस्यातून शेतकऱ्याची सुटका व्हावी म्हणूनच ही योजना मंजूर करण्यात आली होती. परंतु उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांना शेतकऱ्याबद्दल न आस्ता, न कामाची आवड, प्रत्येक योजनेचा बट्ट्याबोळ करणे हेच काम आहे का? अशी शंका शेतकऱ्याकडून व्यक्त होत आहे.
चार महिन्यापूर्वी प्रस्ताव दाखल
नागेवाडी येथील पूर्ण गाव रस्ते व सर्वे नंबर वर पाणंद रस्त्यांचा सर्वे करून एकूण दहा रस्त्याचा अहवाल चार महिन्यापूर्वीच तहसील कार्यालयात दाखल केला आहे. अजून एकही मंजुरी नाही व साधे उत्तरही नाही. आता पावसाळ्यात शेतकऱ्यांना अनेक समस्येला समोर जावे लागेल याला जिम्मेदार कोण?
शिवाजी गोंदवले सरपंच नागेवाडी
कामे न करण्यात धन्यता
ईट मंडळात अजूनही फेरफार, वारसदाराची नोंद, नावातील बदल, असे अनेक कामे प्रलंबित आहेत. मे मध्ये शंतनु देशपांडे यांचे सात बारा वरील कमी झालेले नाव, दुरुस्तीचा प्रस्ताव एक महिन्यापूर्वीच पाठवला होता. अद्याप प्रकरण निकाली निघाले नाही. तसेच ईरफान काझी,यांच्या वारसदार नोंद करताना बहिणीचे आडनाव बदलले होते. त्यांची दुरुस्तीसाठी कागदपत्रे देऊन एक महिना झाला, तरीही अजून काम प्रलंबित आहे. झेंडेवाडी येथील हरिभाऊ चोरमले, बाबा चोरमले यांची वाटणी पत्र देऊन एक वर्ष होत आहे तरी प्रकरण प्रलंबित आहे. वेगवेगळे व शुल्लक त्रुटी काढून कामे आढवण्याची पद्धत बंद करण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. मी लोक न्यायालयात वाटणी पत्र करून एक वर्ष झाले ,सर्व कागदपत्रे दिले परंतु फेरफार दिला नाही असे शिवाजी महाराज गोंदवले नागेवाडी यांनी सांगितले.
