तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शन व्यवस्थेत गुरुवार दिन 18 पासून महत्वपूर्ण बदल करण्यात आला असून, सर्व भाविकांना देवीचे दर्शन समान अंतरावरून आणि अधिक सुलभ पद्धतीने घेता यावे, या उद्देशाने दर्शन व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. श्री तुळजाभवानी मंदिरात सामान दर्शन पद्धत लागू केल्याबद्दल भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे भाविक मंदिर प्रशासनाला धन्यवाद देत आहे.
यापूर्वी 500 रुपये देणगी दर्शन पास रांग आणि 200 रुपये देणगी दर्शन पास रांग अनुक्रमे मंदिर परिसरात फिरून न्हाणी गेट मार्गे तसेच छत्रपती संभाजी महाराज प्रांगणातून जात होती. या मार्गांवर भाविकांसाठी आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देताना काही मर्यादा येत होत्या. नवीन दर्शन व्यवस्थेनुसार 500 रुपये व 200 रुपये देणगी दर्शनाच्या रांगा आता दर्शन मंडपातून जाणार आहेत. त्यामुळे या रांगांमधून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पिण्याचे पाणी, कुलर, स्वच्छतागृह तसेच स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
दरम्यान, नवीन व्यवस्थेमुळे देणगी दर्शनाच्या वेळेवर कोणताही परिणाम होत नसून, 500 रुपये व 200 रुपये देणगी दर्शन रांगांमधून भाविकांना पूर्वीप्रमाणेच कमी वेळेत आणि जलदगतीने श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेता येणार आहे.
