धाराशिव  (प्रतिनिधी)- तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव येथील यांत्रिकी विभागाच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट नुकतीच धाराशिव येथील ग्रीन एनर्जी विंड मिल पॉवर प्लांट येथे आयोजित करण्यात आली. वाढत्या उर्जेची गरज लक्षात घेऊन अपारंपरिक ऊर्जा निर्मितीमध्ये आपल्या देशामध्ये प्रचंड काम सुरू आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये ही पवन ऊर्जा निर्मितीचे मोठमोठे प्रकल्प उभारले जात आहेत त्यामुळे आपल्या यांत्रिकी विभागातील व इलेक्ट्रॉनिक्स स्टील कम्युनिकेशन विभागातील विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्यामध्येच चांगल्या पगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. ह्या गोष्टी लक्षात घेऊन महाविद्यालयाने या सहलीचे नियोजन करण्यात आले होते. या भेटीद्वारे विद्यार्थ्यांना पवन ऊर्जा निर्मिती, विंड टर्बाईनची रचना, त्यातील विविध घटक तसेच वीज निर्मिती प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती घेण्याची संधी मिळाली.

प्लांटचे साईट इंजिनियर पाटील सर व कृष्णा जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना विंड टर्बाईनचे कार्य, देखभाल, सुरक्षा उपाययोजना आणि पवन ऊर्जेचे भविष्यातील महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी टर्बाईन ब्लेड, टॉवर, नॅसेल आदी घटकांची प्रत्यक्ष पाहणी करून तांत्रिक बाबींची माहिती घेतली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. माने यांनी या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये उद्योग क्षेत्राविषयी उत्सुकता वाढून त्यांच्या व्यावहारिक ज्ञानात मोलाची भर पडल्याची भावना व्यक्त केली. अकॅडेमिक डीन व यांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. डी. डी. दाते यांनी येणारा काळ हा अपारंपारिक ऊर्जेचा असल्याने अशा ऊर्जा स्त्रोतांना भविष्यात विशेष महत्त्व असल्याचे मत नोंदवले. ही औद्योगिक भेट प्रा. एस. डी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली व एम. जी. चौधरी यांनी सहकार्य केले.

 
Top