धाराशिव (प्रतिनिधी)- शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी तसेच योगाच्या फायद्यांविषयी जनसामान्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,धाराशिव यांच्या वतीने रविवारी दि.21 जून रोजी सकाळी जिल्हा न्यायालय परिसरात जागतिक योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती अभिश्री देव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश देव म्हणाल्या की,एका विशिष्ट वयोमानानंतर योग आणि व्यायामाचे महत्त्व प्रकर्षाने जाणवते.'जान है तो जहान है' या उक्तीप्रमाणे शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी योगाचा नियमित अवलंब करणे आवश्यक आहे.योग केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता तो दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे,असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी योगाचे महत्त्व विषद केले.मन प्रसन्न करण्याचा मार्ग निरोगी शरीरातून जातो,असे सांगताना त्यांनी भारताची पाच हजार वर्षांची योगपरंपरा ही जगाला दिलेली अनमोल देणगी असल्याचे नमूद केले.पूर्वी महात्मा गांधी यांनी ‌‘खेड्याकडे चला' असा संदेश दिला होता.मात्र आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीत ‌‘योगाकडे चला' असे म्हणण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

यावेळी योग मार्गदर्शक राम ढेरे आणि अनुस्थ नागटिळक यांनी उपस्थितांना योगाचे विविध प्रकार,त्याचे महत्त्व आणि आरोग्यदायी फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.मार्गदर्शनपर सत्रानंतर उपस्थितांनी उत्साहाने योगाभ्यास आणि प्राणायाम केला.

कार्यक्रमास जिल्हा न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश एफ.ए.के.एम.ख्वाजा,जिल्हा न्यायाधीश एस.जी.ठूबे यांच्यासह अन्य न्यायाधीश उपस्थित होते.तसेच विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड.खंडेराव चौरे,शासकीय अभियोक्ता श्री.महेंद्र देशमुख, न्यायालयीन कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विधिज्ञ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पॅनल विधिज्ञ ॲड.भाग्यश्री कदम यांनी केले,तर आभार प्रदर्शन सहाय्यक न्यायरक्षक ॲड.शुभम गाडे यांनी केले.जिल्हा न्यायालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

 
Top