धाराशिव (प्रतिनिधी)-शिवसेना उबाठा गटाचे 6 खासदार फुटून त्यांनी वेगळा गट स्थापन केला आहे. धाराशिवचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर हे ऑपरेशन टायगरचा भाग असुन ते शिंदे गटात जाणार असल्याचे निश्चित आहे. कै पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा निकाल 20 जुन रोजी लागणार असुन त्या निकालानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. तर धाराशिव जिल्ह्यातील आमदार कैलास पाटील व आमदार प्रविण स्वामी यांनी आपली भूमिका स्पष्ट करीत आपण उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत कायम राहणार आहोत असे लोकराज्यशी  बोलताना सांगितले.

ओमराजे हे शिंदे गटात जाणार असले तरी धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील हे मात्र ठाकरे गटातच राहणार आहेत. आमदार पाटील ठाकरे गटात राहून ‌‘खिंड' लढवणार आहेत.“बाकी काहीही असो, आपण मात्र शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासोबतच आहोत. काल, आज आणि  उद्याही आम्ही ठाकरेंसोबतच राहणार अशी भुमिका स्पष्ट केली. ओमराजे यांच्या संभाव्य प्रवेश व इतर बाबीवर त्यांनी बोलण्यास टाळले. तर लोहारा-उमरग्याचे आमदार प्रविण स्वामी यांनी उध्दव ठाकरे यांच्यामुळेच आपण आमदार झालो असून, मी कायम उध्दव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचे सांगितले. 

एकेकाळी धाराशिव जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. शिवसेनेत फुट पडल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील व आमदार प्रविण स्वामी यांनी खंबीरपणे उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहिले होते. परंतु ऑपरेशन टायगर नंतर ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे शिवसेनेच्याबाबत आपली भूमिका 20 जून नंतर स्पष्ट करणार असल्याचे सांगितले आहे. 

 
Top