धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात भीषण दुष्काळ व नैसर्गिक संकट आले असताना तसेच शेतकरी, सर्वसामान्य जनता, कष्टकरी कामगार, युवक, अल्पसंख्यांक या सर्वांना वाऱ्यावर सोडून जनतेच्या करातील पैशातून ऑपरेशन टायगर म्हणजे बैल बाजार भरवून घाऊक भावात आमदार, खासदार फोडण्याचे काम मंत्री एकनाथ शिंदे हे करत आहेत, त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी समाजवादी नेते ॲड रेवण भोसले यांनी केली आहे.
भाजप शिवसेनेच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रातील शेतकरी उध्वस्त झाला आहे. कांदा उत्पादक शेतकरी व इतर पिकांच्या कोसळलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव दिला जात नाही तर आमदार, खासदार नावाच्या मालाला मात्र जोरदार हमीभाव दिला जात आहे .महागाई गगनाला भिडली असून डिझेलच्या टंचाईमुळे व वाढत्या दरामुळे ग्रामीण भागातील शेतकरी त्रस्त झाला आहे . शेतीसाठी घेतलेले कर्ज व वाढत्या खर्चामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच मराठवाडा व पश्चिम विदर्भातील हजारो शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे.शेतकरी कर्जमाफी ही फसवी असून जाचक अटी व शर्ती लावून भाजप शिवसेना सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल व फसवणूक करत आहे. बेरोजगारी व कायदा सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे .पाऊस लांबल्यामुळे शेतकऱ्यांच्या गुराढोरांच्या चारा- पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे , असे विविध प्रश्न बाजूला ठेवून महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर नावाचे ऑपरेशन घडवून आणण्यातच मंत्री एकनाथ शिंदे गुंतले आहेत ,त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून तात्काळ मुक्त करण्यात यावे असे मागणी ॲड भोसले यांनी केली आहे.
