कळंब (प्रतिनिधी)- साईनगर परिसरात तीन माकडांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही माकडे महिला व लहान मुलांच्या अंगावर धावून जात असल्याच्या तक्रारी समोर येत असून, त्यामुळे परिसरातील चिमुकले रस्त्यावर खेळण्यासाठीही बाहेर पडत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
माकडांच्या सततच्या उपद्रवामुळे महिला घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. शाळेत जाणाऱ्या लहान मुलांमध्येही भीतीचे वातावरण असून, पालक चिंतेत पडले आहेत. घरासमोर वाळत घातलेले कपडे फाडणे, दारात ठेवलेले सामान अस्ताव्यस्त करणे, घरांच्या परिसरात घुसून नुकसान करणे असे प्रकार या माकडांकडून सुरू असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
“माकडांचा हा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, एखादी गंभीर घटना घडण्याची वाट वन विभाग पाहत आहे का?” असा संतप्त सवाल साईनगरवासीयांनी उपस्थित केला आहे. तीन माकडांनी परिसरातील नागरिकांचे जगणे त्रस्त केले असून, लहान मुले आणि महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. वन विभागाने तातडीने पथक पाठवून या माकडांना पकडून परिसरातून हटवावे, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे. पुढील दोन दिवसांत ठोस कारवाई झाली नाही, तर साईनगरमधील नागरिक वन विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढतील, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.