तुळजापूर (प्रतिनिधी)- जिद्द, चिकाटी आणि समाजसेवेची प्रबळ इच्छा असेल तर ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठी स्वप्ने साकार करू शकतात, याचे उदाहरण तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील सिद्धी संतोष देशपांडे हिने घालून दिले आहे. डॉक्टर बनून ग्रामीण भागातील जनतेची आरोग्यसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या सिद्धीने वैद्यकीय शिक्षणासाठी फिलिपिन्सची वाट धरली आहे.
भारतामध्ये एमबीबीएस शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्याने अनेक विद्यार्थ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण होतात. भारतात एमबीबीएस शिक्षणासाठी सुमारे 80 ते 90 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असताना फिलिपिन्समध्ये राहण्याचा, जेवणाचा आणि वैद्यकीय शिक्षणाचा मिळून साडेपाच वर्षांचा संपूर्ण अभ्यासक्रम सुमारे 40 ते 45 लाख रुपयांत पूर्ण होतो. याच पार्श्वभूमीवर सिद्धीने परदेशात शिक्षण घेण्याचा निर्धार केला आणि आपल्या आजोबांकडे फिलिपिन्समध्ये एमबीबीएस करण्याचा हट्ट धरला. कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे तिचे हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे.
सिद्धी नुकतीच दवाओ मेडिकल कॉलेज, फिलिपिन्स येथे वैद्यकीय शिक्षणासाठी रवाना झाली आहे. डॉक्टर झाल्यानंतर ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याचा तिचा मानस असून, सेवाभाव हेच आपल्या वैद्यकीय व्यवसायाचे ब्रीद असेल, असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. आपल्या ला एमबीबीएस शिक्षण घेण्यासाठी फिलिपिन्सला पाठवण्याचे श्रेय सिद्धीने वडील संतोष तात्यासाहेब देशपांडे, आई अर्चना संतोष देशपांडे, आजोबा तात्यासाहेब केशवराव देशपांडे, तसेच शिक्षक आणि मार्गदर्शकांना दिले आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यानंतर ग्रामीण आणि सर्वसामान्य रुग्णांची सेवा करण्याची इच्छा तिने व्यक्त केली. शेतकरी व सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या या विद्यार्थिनीने दाखविलेली जिद्द आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
