तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या व दर्शन व्यवस्थेतील सुसूत्रता लक्षात घेऊन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने दर्शन व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. नवीन दर्शन व्यवस्था गुरुवार, दि. 18 जूनपासून अंमलात येणार आहे.
नवीन दर्शन व्यवस्थेनुसार 500 रुपये देणगी दर्शन पासधारक व रेफरल देणगी दर्शन पासधारक भाविकांना राजे शहाजी महाद्वार मार्गे मंदिरात प्रवेश देण्यात येईल. त्यानंतर कल्लोळ तीर्थाच्या बाजूने टोळभैरव पायऱ्या मार्गे दर्शन मंडपाच्या तिसऱ्या मजल्यावर प्रवेश देऊन तेथून पहिल्या मजल्यात सोडण्यात येईल.
200 रुपये देणगी दर्शन पासधारक भाविकांना बिडकर पायऱ्या मार्गे दर्शन मंडपाच्या पहिल्या मजल्यात इमर्जन्सी गेट मार्गे प्रवेश देण्यात येईल.
धर्मदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बिडकर पायऱ्या मार्गे दर्शन मंडपाच्या चौथ्या मजल्यावर प्रवेश देण्यात येईल. याप्रमाणे दर्शन मंडप पहिल्या मजल्यातील भुयारी मार्गात 500 रुपये /200 रुपये देणगी दर्शन व धर्मदर्शन रांग एकत्रित करून पुढे भाविकांना एकसमानतेने श्रीदेवीजींच्या दर्शनासाठी सोडण्यात येईल.
मुखदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची रांग बिडकर पायऱ्या मार्गे दर्शन मंडपाच्या तळमजल्यावर सोडण्यात येणार आहे. तसेच सिंहासन पूजा व अभिषेक पूजेसाठी येणाऱ्या भाविकांची व्यवस्था पूर्वीप्रमाणेच राहणार असून सिंहासन पूजेची रांग दत्त मंदिर गेटमधून तर अभिषेक पूजेची रांग छत्रपती संभाजी महाराज प्रांगणातून सोडण्यात येईल.
नवीन दर्शन व्यवस्थेमुळे 500 रुपये देणगी दर्शन, रेफरल देणगी दर्शन, 200 रुपये देणगी दर्शन तसेच धर्मदर्शन रांगेतील सर्व भाविकांना आता एकाच ठिकाणाहून, म्हणजेच सिंहाच्या गाभाऱ्यातून श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे देणगी दर्शन रांग आणि सामान्य रांगेतील भाविकांच्या दर्शनस्थळातील फरक दूर होणार असून सर्व भाविकांना समान अंतरावरून आणि समान पद्धतीने देवींचे दर्शन घेता येणार आहे.
पूर्वीच्या दर्शन व्यवस्थेमध्ये देणगी दर्शन रांगेतील भाविकांमुळे धर्मदर्शन रांगेतील भाविकांना श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेण्यास अडथळे निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर सर्व भाविकांना देवीचे दर्शन समान अंतरावरून आणि अधिक सुलभ पद्धतीने घेता यावे, या उद्देशाने दर्शन व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.
तसेच, पूर्वीच्या दर्शन व्यवस्थेनुसार सिंहासन पूजा व अभिषेक पूजा सुरू असताना देणगी दर्शन पासधारकांची रांग तात्पुरती बंद ठेवावी लागत होती. मात्र, नव्या दर्शन व्यवस्थेमुळे आता देणगी दर्शन पासधारक भाविकांना पूर्णवेळ (गर्दीची परिस्थितीनुसार वेळोवेळी करावे लागणारे बदलाचे अधीन राहून) दर्शनाची सुविधा उपलब्ध होईल. श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी नवीन दर्शन व्यवस्थेतील बदलास सहकार्य करावे, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
