धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत सवलतीच्या प्रवासाचा लाभ घेणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व इतर सवलतधारक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) 1 ऑगस्टपासून बंधनकारक करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात कार्ड नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आणून देत या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी रुपामाता फाऊंडेशनचे सचिव ॲड. अजित गुंड पाटील यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना त्यांच्या कार्यालयात सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, एनसीएमसी कार्ड नोंदणीसाठी जिल्ह्यातील उपलब्ध केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून केंद्रांची संख्या अपुरी पडत आहे. मर्यादित वेळेत नोंदणी होत असल्यामुळे पहाटेपासून रांगेत उभे राहूनही अनेक नागरिकांना नोंदणी न करता परत जावे लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व ग्रामीण भागातील प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 1 ऑगस्टपूर्वी सर्व पात्र सवलतधारक प्रवाशांकडे एनसीएमसी कार्ड उपलब्ध होणे आवश्यक असल्याने नोंदणी प्रक्रियेला अधिक गती देणे गरजेचे असल्याचे ॲड. गुंड पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे. परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांची होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा ॲड. अजित गुंड पाटील यांनी व्यक्त केली आहे.
