तुळजापूर  (प्रतिनिधी)-“विकासाच्या“ गोंडस नावाखाली तुळजापूर तालुक्यात सुरू असलेल्या सोलर प्रकल्पांनी खरंच स्थानिक भूमिपुत्रांचे जीवन उजळवले की त्यांच्या संसारावर अंधार पसरवला? हा प्रश्न आता ग्रामीण भागातून जोरदारपणे उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील दहिवडी, सावरगाव, गंजेवाडी, माळुंब्रा, मसला आणि परिसरातील हजारो एकर जमीन विविध सोलर कंपन्यांच्या ताब्यात गेल्यानंतर पशुपालन आणि दुग्धव्यवसायाला मोठा फटका बसल्याचा आरोप शेतकरी व ग्रामस्थांकडून केला जात आहे.


हजारो एकर चराऊ जमिनी बंदिस्त

सोलर प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी अथवा भाडेपट्टीवर घेण्यात आली. प्रकल्प उभारल्यानंतर या जमिनी कुंपण घालून बंदिस्त करण्यात आल्या. परिणामी, पूर्वी जनावरांसाठी उपलब्ध असलेले नैसर्गिक चारागाह आणि गवताळ क्षेत्र पूर्णपणे बंद झाले. याचा थेट परिणाम पशुपालकांवर झाला.


चाऱ्याअभावी जनावरे विकण्याची वेळ

आधीच दुष्काळ, अनियमित पाऊस, वाढते कर्ज आणि शेतीतील तोटा यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना चाऱ्याची टंचाई आणखी महागात पडली. अनेकांनी आपल्या जनावरांचा सांभाळ करणे अशक्य झाल्याने ती विकून टाकली. परिणामी, अनेक गावांमध्ये वर्षानुवर्षे गजबजलेल्या दावण्या आज ओस पडल्याचे चित्र दिसत आहे.


दूध उत्पादनात मोठी घट

जनावरांची संख्या घटल्याने तालुक्यातील दूध उत्पादनावरही गंभीर परिणाम झाला आहे. स्थानिक दुग्ध व्यवसाय कमकुवत होत असताना बाजारात भेसळयुक्त दुधाचा शिरकाव वाढल्याची चर्चा सुरू आहे. कमी खर्चात जास्त नफा मिळवण्यासाठी काही मंडळींकडून बनावट दूध विक्रीचा उद्योग फोफावत असल्याचे आरोप होत आहेत.


कंपन्या मालामाल, भूमिपुत्र कंगाल?

स्थानिकांच्या मते, ज्या जमिनींवर पूर्वी शेतकरी मालक होते, त्याच जमिनींवर आज त्यांच्या मुलांना अल्प मजुरीवर काम करावे लागत आहे. रोजगाराच्या मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या; मात्र कायमस्वरूपी आणि सन्मानजनक रोजगार किती मिळाला, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.


ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका

पशुपालन, दूध व्यवसाय, शेतीपूरक रोजगार आणि स्थानिक बाजारपेठ या सर्वांची साखळीच तुटल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे. शेतकरी, शेतमजूर, दूध संकलन केंद्रे आणि संबंधित व्यवसायांवर त्याचा परिणाम जाणवत आहे.


बेरोजगारीचा वाढता धोका

गावातील तरुणांच्या हाताला काम नसल्याने बेरोजगारी वाढत आहे. रोजगाराच्या संधी कमी झाल्यास सामाजिक असंतोष वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विकासाच्या मॉडेलचा फेरविचार करण्याची मागणी आता अधिक तीव्र होत आहे.


जनतेचा सवाल

“तुळजापूर तालुका खरोखर विकसित झाला की सोलर प्रकल्पांच्या सावटाखाली भकास झाला?“

आज हा प्रश्न केवळ शेतकऱ्यांचाच नाही, तर संपूर्ण ग्रामीण समाजाच्या भवितव्याशी जोडलेला आहे. पर्यावरणपूरक ऊर्जेचे स्वागत असले तरी स्थानिक शेती, पशुपालन आणि रोजगार यांचे संरक्षणही तितकेच महत्त्वाचे असल्याची भावना ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे.

 
Top