तुळजापूर  (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी मंदिरातील भाविकांच्या दर्शन व्यवस्थेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून 23 जून ते 25 जून या कालावधीत भाविकांना पुन्हा महाद्वारातून प्रवेश देण्यात येणार आहे. पुजारी मंडळाच्या मागणीची दखल घेत मंदिर प्रशासनाने हा निर्णय जाहीर केला आहे.

मंदिर प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिर प्रकटनानुसार, 22 जून रोजी नगराध्यक्ष, विश्वस्त सदस्य तसेच तिन्ही पुजारी मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाची भेट घेऊन भाविकांना महाद्वारातून प्रवेश देण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने प्रायोगिक तत्त्वावर ही व्यवस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या व्यवस्थेनुसार भाविकांना महाद्वारातून प्रवेश देऊन धर्मदर्शन व मुखदर्शनासाठी कल्लोळ तीर्थ परिसरातून पाटील वाड्याकडील मार्गाने दर्शन मंडपात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे देवीचे दर्शन अधिक सुलभ व पारंपरिक पद्धतीने घेता येणार असल्याने भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

दरम्यान, अभिषेक पासधारक तसेच 300 रुपयांच्या देणगी पासधारकांसाठी पूर्वीची व्यवस्था कायम ठेवण्यात आली आहे. या भाविकांना महाद्वारातूनच कल्लोळ तीर्थाच्या बाजूने प्रवेश देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तहसीलदार तथा प्रशासन व्यवस्थापक माया माने यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या या आदेशामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दर्शन मार्गाच्या वादावर तात्पुरता तोडगा निघाल्याचे मानले जात आहे. भाविकांच्या प्रतिसादानंतर ही व्यवस्था कायम ठेवायची की नाही याबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

 
Top