परंडा (प्रतिनिधी)- परंड्याचे सुपुत्र जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ, शिवाजी विद्यापीठाचे संशोधक प्रा. डॉ. गजानन शंकरराव राशीनकर यांचा जगातील टॉप 5% शास्त्रज्ञांमध्ये समावेश करण्यात आला आहे. याबद्दल भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी प्रा.डॉ.राशीनकर यांचे दूरध्वनीवर संपर्क साधून अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
परंडा येथील असलेले प्रा.डॉ.गजानन राशीनकर हे शिवाजी विद्यापीठात आघाडीचे संशोधक व रसायनशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असून त्यांचे वडील स्व.शंकरराव राशीणकर हे भू विकास बँकेचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक होते. तर त्यांच्या मातोश्री स्व. उमाबाई वडेकर या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका होत्या. प्रा. डॉ. गजानन राशीनकर यांनी अनेक वेळा सेट-नेट परीक्षा उत्तीर्ण होण्याचा विक्रम केलेला आहे. प्रा.डॉ.गजानन राशीनकर यांच्या महिलांच्या स्तनाच्या कर्करोगावरील ‘हायपरथर्मिया'- “चुंबकीय नॅनो कणांची निर्मिती” या संशोधनाला भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय युके पेटंट प्राप्त झाले आहे. या संशोधनामुळे शस्त्रक्रिया व जखमेविना उपचार करणे शक्य झाले असून स्तनाच्या कर्करोगावरील उपचारात माता भगिनींची किमोथेरेपीच्या जीवघेण्या त्रासातून मुक्तता होणार आहे. नॅनो-मेडिसिन यात क्रांतिकारी संशोधन त्यांनी केले आहे.
संशोधन क्षेत्रात पर्यावरणपूरक पद्धतीने नवीन रासायनिक संयुगे बनवणे, कॅन्सर विरोधी संयुगे, जैविक दृष्ट्या सक्रिय रेणूंचे संश्लेषण या विषयावर प्रा. डॉ.गजानन राशीनकर यांचे कार्य उल्लेखनीय आहे. प्रा.डॉ.गजानन राशीनकर यांचे संशोधन व कार्य अभिमानास्पद आणि युवकांना प्रेरणादायी आहे. परंडा येथे लवकरच भूषणावह असलेल्या आपल्या या सुपुत्राचा सत्कार व सन्मान सोहळा आयोजित करण्याचा मनोदय मा.आ.सुजितसिंह ठाकूर यांनी व्यक्त केला.
