वाशी (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी विद्यालय, वाशी येथील माजी विद्यार्थी तथा बार्शी येथील कॅन्सर हॉस्पिटलचे प्रसिद्ध सर्जन डॉ. अनंत माने यांनी शिक्षण क्षेत्राप्रती असलेली आपली बांधिलकी जपत विद्यालयासाठी एक लाख रुपयांचा निधी प्रदान केला आहे. या निधीतून कै. लक्ष्मीबाई जगदाळे मुलींच्या वसतिगृहासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, इन्व्हर्टर, पंखे तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
डॉ. माने यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. आर. थोरखोले यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला. त्यांच्या या योगदानामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसह वसतिगृहातील सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. यावेळी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शीचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष एन. एन. जगदाळे, सचिव पी. टी. पाटील, सहसचिव ए. पी. देवडवार, खजिनदार जयकुमार शितोळे तसेच कार्यकारिणी सदस्यांनी डॉ. माने यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. आर. थोरखोले, पर्यवेक्षक बी. एम. सावंत, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष संदीप सुंदरराव कवडे, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष नेताजी नलवडे व ग्रामस्थांनी डॉ. अनंत माने यांचे आभार व्यक्त केले. माजी विद्यार्थ्याने आपल्या शाळेप्रती व्यक्त केलेली ही कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकी इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत असून, या निधीमुळे विद्यार्थिनींच्या शैक्षणिक आणि निवासी सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा होणार आहे.
