धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या दोन धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. तुळजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी देऊन वर्षभर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर दुसरीकडे, मुरुम पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 30 वर्षीय महिलेला लग्नाचे खोटे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्हे 18 जून रोजी दाखल झाले असून पोलीस तपास करत आहेत.
येथील एका गावातील 17 वर्षे 5 महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलीवर एका नराधम तरुणाने तब्बल वर्षभर बळजबरीने अत्याचार केला. आरोपी तरुणाने पीडित मुलीला “तुझ्या भावाच्या अंगावर टिप्पर घालून त्याला ठार मारीन,” अशी वारंवार भीती घातली. भावाच्या जिवाचे काही बरे-वाईट होऊ नये म्हणून पीडिता गप्प राहिली. याच भीतीचा गैरफायदा घेत आरोपीने तिला विनापरवाना अर्टिका कार आणि मोटरसायकलवर बसवून वेगवेगळ्या लॉजवर तसेच डोंगराळ भागात नेले. तिथे तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार केला. हा छळ 19 जून 2025 पासून ते 15 मे 2026 पर्यंत सुरू होता. अखेर या छळाला कंटाळून पीडितेने 18 जून 2026 रोजी तुळजापूर पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नराधम तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 64(1), 78, 351(3) आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) कलम 4, 8, 12 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी घटना मुरुम पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, येथे एका 30 वर्षीय महिलेची लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे. गावातीलच एका तरुणाने पीडित महिलेला “मी तुझ्याशी लग्न करेन,” असे खोटे आमिष दाखवले. त्यानंतर 6 जून 2026 ते 15 जून 2026 या कालावधीत पीडितेच्या आई-वडिलांच्या घरातच तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. काही दिवसांनी पीडित महिलेने लग्न कधी करणार, अशी विचारणा केली असता, नराधम तरुणाने लग्न करण्यास साफ नकार दिला आणि तिची फसवणूक केली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने 18 जून 2026 रोजी मुरुम पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या प्रथम खबरीवरून पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 69 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या दोन्ही गंभीर प्रकरणांची नोंद पोलीस प्रशासनाने घेतली असून, दोन्ही नराधम आरोपींचा शोध घेण्यासाठी तुळजापूर आणि मुरुम पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.